Sunday, December 9, 2018

मी पाहिलेली अमेरिका- भाग ८

स्पेस नीडल, शिहूली गार्डन, इंटरनॅशनल फाउंटन 

            मी आज सिऍटल  मधल्या 'स्पेस नीडल' .. विषयी लिहिणार आहे. स्पेस नीडल हे पर्यटकांचं खास आकर्षण. आणि ही 'स्पेस नीडल'  माझ्यासाठी खास आहे कारण तिथून आमचं घर हे अगदी पाच मिनिटांवर आहे. आमच्या बिल्डिंग च्या गच्चीतून  स्पेस नीडल  अगदी समोर दिसते. 



थोडक्यात सांगायचं तर उंच, लांबसडक आणि ऐटदार अशी स्पेस नीडल  माझी लाडकी आहे. 


तर ही स्पेस नीडल नेमकी काय आहे?
अगदी सोप्या भाषेत सांगू तर..ही स्पेस नीडल वेगळ्या आकारात बांधली आहे. याचं आर्किटेक्चर पाहण्यासारखं आहे. त्याची उंची १५८ फिट इतकी आहे.   खाली तिकीट काढून पर्यटक स्पेस नीडल मधल्या लिफ्ट ने वर जातात जिथे ऑबझर्व्हेटरी डेस्क आहे.. जिथून आपल्याला सिऍटल ची संपूर्ण स्काय लाईन दिसते. 









मूळात  हा observatory  tower  आहे. 
संपूर्ण आजूबाजूला फक्त काच आहे.. त्यामुळे त्या काचेवर आडवं  पडून फोटो काढायला सुद्धा खूप मजा येते. 



इथे अनेक obsevation  tower  च्या ठिकाणी मी एक गोष्ट  नेहमी पाहात  आले ... ती म्हणजे, इथे आपला एक फोटो काढून देतात.. नंतर त्याची एक छान फ्रेम किंवा फक्त त्या फोटोची कॉपी आपण विकत घेऊ शकतो किंवा काहीवेळा ते आपल्याला मेल  करतात. असाच आम्ही इथे आल्यावर काढल्यावर आमचा फोटो.  




स्पेस नीडल च्या आजूबाजूचा परिसर सुद्धा भन्नाट आवडतो मला.. अहो का नाही आवडणार... ? 
कितीतरी विस्तारलेला  छान हिरवळ असलेला परिसर... मोठं  कारंज, मोनोरेल, एक खाऊचा मॉल..आजूबाजूला झाडं  .. 





आणि आता ख्रिसमस मध्ये तर झाडांवर आणि झाडांभोवती इतके सुंदर लाईट्स लावतात.. कि  अगदीच इंग्रजी चित्रपटातल्या  ख्रिसमस च्या शूटिंग ला आलोय असा  मला भास अनेकवेळा झाला आहे. 
१७ एप्रिल ,१९६१ साली स्पेस नीडलच बांधकाम सुरु झालं आणि ८ डिसेंबर १९६१ला  December 8, 1961 पूर्ण झालं. याच  

ओपनिंग २१ एप्रिल,१९६२ साली झालं.  

स्पेस नीडल मध्ये जाताना याचं  बांधकाम कसं  झालं? आणि त्याचे मॉडेल्स त्यांनी ठेवले आहेत.. त्यामुळे लिफ्ट च्या लाईनमध्ये उभे असताना या गोष्टी पाहत पाहत पर्यटक पुढे जात असतो. 






शिहूली  गार्डन आणि ग्लास म्युझियम 

'स्पेस नीडल'  च्या आवारात असणारं 'शिहूली  गार्डन आणि ग्लास म्युझियम' हे आवर्जून पाहण्यासारखं ठिकाण आहे.  

 
आता थोडं  शिहूली  गार्डन विषयी लिहिणार आहे... आणि सोबत तिथले फोटो सुद्धा जोडत आहे. 

आपण सगळ्यांनी काच पहिली आहे, ग्लास पेंटिंग पाहिलं आहे. मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये काचा हेच पार्टीशन असतं , त्याचं  भिंती असतात किंवा अजून बऱ्याच प्रकारे आपण काच पाहिली असेल.. मी पण पा हिली आहे.. 
पण माझ्यासाठी काच ही संकल्पना  म्हणजे ग्लास पेंटिंग पुरती मर्यादित होती.. पण जेव्हा आम्ही शिहूली  गार्डन पाहायला गेलो तेव्हा काचेकडे पाहण्याचे सगळेच दृष्टिकोन बदलले. कारण शिहूली या अत्यंत प्रतिभावान कलाकाराने काचेच्या अनोख्या विश्वा च दर्शन घडवलं.. 
केवढी ती  वेगवगेळी रूपं ...प्रत्येक इंस्टॉलेशन पाहून डोळे दिपून जात होते.. आणि मन थक्क होतं.



  
काचेला वेगवेगळे रंग देऊन, वितळवून त्याला कल्पनेतल्या थीम प्रमाणे त्यांनी उभं केलं आहे.. निरनिराळे लहान मोठे आकार, त्यातले बारकावे.. खरंच पाहण्यासारखे.
शिहूली  यांनी पूर्वीच्या इंडियन्स ( अमेरिकन) लोकांनी वापरलेली भांडी कशी असतील याचा विचार करून त्या आकारला समोर ठेवून काही काचेच्या  गोष्टी बनवल्या.. 



तर एकीकडे निळ्याशार रंगाचं समुद्राच्या आतमध्ये असणारं  चित्र हुबेहूब आपल्यासमोर उभं केलं आहे..

हे सगळं पाहताना पुढे दिसतं..   ते आपल्या डोक्यावर असणाऱ्या काचा... म्हणजेच आपण पाण्याखाली आहोत.. आणि पाण्यातल्या  बाकी गोष्टी आपल्याला वर  दिसत आहेत याचा भास तेव्हा होतो... कितीतरी वेगवेगळे  असे त्या इंस्टॉलेशन्स चे प्रकार तिथे पाहायला मिळतात. 


अशीच अजून एक समुद्रातली  कलाकृती तर अतिप्रचंड मोठी...






 
कसं  काय केलं त्यांनी इतकं.. असे सगळे विचार मनात घेऊन मी पण पुढे पुढे चालत होते. 
पुढे गेल्यावर पाहिलं अजून एक नवा प्रकार पाहायला मिळाला...   त्या इन्स्टॉलेशनकडे पाहिल्यावर वाटत होतं  की, काचांची उलटी झुंबर लटकवली आहेत. 



एका ठिकाणी  रंगांच्या वेगवगेळ्या छटा आपल्याला या काचांमध्ये पाहायला मिळतात..




फुलांची काचेची वेल हे शिहूली  याचं  ड्रीम प्रोजेक्ट... 






 

आता थोडसं..इंटनॅशनल फाऊंटन बद्दल..

हे कारंज  बऱ्यापैकी मोठं आहे. याचा  एक अनुभव सांगते..    
परवा  मी या इंटरनॅशनल फाउंटन च्या दिशेने जात होते. तेव्हा मनात आलं .. जरा थांबूया. हातात बरंच  सामान होतं. बसले.. आणि थोड्याच वेळात मोठ्या आवाजात गाणं सुरु झालं.. आणि हे कारंज  चक्क नाचू लागलं ... 
त्या कारंजातल्या पाण्याने गाण्यातला सूर आणि ताल अगदी नीट धरला होता.. आणि अगदी स्वतःच्या दिमाखदार पद्धतीने पाण्याचे स्ट्रोक 
शब्दांप्रमाणे वर खाली उडत होते. जोरात पाणी एकदम वर उडताना पाहून खूप मजा वाटते. 



आज ब्लॉग मध्ये लिहिलेली माहिती ही थोडक्यात लिहिली आहे. अधिका अधिक फोटो शेअर केले आहेत.हा भाग विशेषतः युट्युब वर जाऊन नक्की ऐका .. 
यात या तीनही ठिकाणांचे व्हिडीओ तुम्हाला पाहता येतील. 






Sunday, December 2, 2018

मी पाहिलेली अमेरिका- भाग ७

मागच्या भागात अमेरिकेतलं  नाट्यगृह आणि मी इथे आल्यावर पाहिलेलं नाटक - 'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' या विषयी लिहिलं होतं.
आता सातव्या भागात काय लिहावं हा विचार मनात चालू तर होताच .. खरतरं  खूप विषय लिहायचे आहेत पण खूप पर्याय असले की  गोंधळ पण तेवढाच होतो असं  माझं विशेषतः हा भाग लिहिण्याच्या आधी झालं. 


पण ते असो..'बी विथ द फ्लो' ('be  with  the flow')  राहिलं  की हा प्रश्न एका झटक्यात सुटतो. तसाच हा प्रश्न सुटला ते हॉटेल मध्ये जेवता जेवता... आणि न आवडलेले 'डम्पलिंग्स' जेव्हा अगदीच आवडीचे झाले तेव्हा..




कोणतं हॉटेल? कोणती डम्पलिंग्स? .... असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच...

ती तर एक मस्त गंमत  आहे.. जी मी आता मांडणार तर आहेच शिवाय इथली खाद्यसंस्कृती, इथली हॉटेल्स, खाण्या-पिण्याच्या पध्द्ती या विषयी आज थोडं लिहिणार आहे.

इथल्या 'रेस्टोरंटस' चा appearance कसा असतो?


इथे येऊन मला आता चार महिने झाले आहेत. या चार महिन्यात खूप वेगवगेळ्या रेस्टोरंन्टस  मध्ये आम्ही जेवायला गेलो. सुरुवातीला मला प्रत्येक रेस्टोरंट मध्ये गेल्यावर खूप अंधार, काळोख अधिक प्रमाणात जाणवायचा. 'डिम लाइट्स' अनेक रेस्टोरंन्टस  मध्ये पाहिले. इतक्या काळोखात कसं  जेवायचं हा  विचार आणि प्रश्न नेहमीच माझ्या मनात यायचा. पण प्रत्येक टेबलावर छान डेकोरेटिव्ह मेणबत्त्या ठेवलेल्या असतात.. अगदी 'कँडल लाईट डिनर' चा फील येतो..  
प्रत्येक रेस्टोरंन्टसची एकूण रचना छान असते. प्रत्येक रेस्टोरंट मध्ये बार कॉउंटर असतो. इथे बसून सुद्धा आपण आपली नॉर्मल जेवणाची ऑर्डर देऊ शकतो. ब्रेकफास्ट बार सारखा उंच ओटा आणि उंच खुर्च्या इथे असतात.. इथे पाच दिवसांचा आठवडा असतो, त्यामुळे शनिवार रविवारी इथे सुट्टी असते..अर्थात रेस्टोरंट मधली गर्दी वाढते. अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी चालू असतात. त्यामुळे कधी कधी आपापसांत  बोलायला सुद्धा त्रास होतो. शिवाय बार काउंटर समोर टीव्ही असतो..त्यावर match  वगैरे चालू असते.. 

असा साधारण फील मला आला.. तो हा अनुभव.   


'रेस्टोरंट' मधल्या काही पद्धती- 

साधारणतः भारतात आपण जेव्हा रेस्टोरंट मध्ये जातो तेव्हा आपण थेट आपल्याला कुठे बसायचं आहे तिथे आपली आवडती जागा पाहून ती निवडतो आणि बसतो. पण इथे अशी पद्धत नाही..आपण असेच आत इथे जाऊ शकत नाही. म्हणजे तसा  काही कडक नियम असा   नाही .. कारण आम्ही एकदा एका रेस्टोरंट मध्ये गेलो होतो.. रोड साईड  टेबल्स होती.. आणि ती 'लेडी वेटर' आम्हाला दुसरी जागा देत होती.. तर आम्ही तिला विचारलं.. की  इथे न बसता या टेबलवर बसलो तर चालेल का? तर ती 'हो' म्हणाली.. पण साधारणतः आपण ते जिथे आपल्याला जागा देतात तिथे आपण बसतो.. 
प्रत्येक रेस्टोरंट मध्ये गेल्या गेल्या एक छोटं  टेबल असतं. तिथे खवय्यांचं स्वागत केलं जातं. आपल्याला किती जणांसाठी टेबल हवं आहे हे आपण तिथे सांगतो. आणि ती व्यक्ती  मेन्यूकार्ड्स  घेऊन आपल्याला जागा दाखवण्यासाठी घेऊन जाते. ती सांगेल त्याठिकाणी आपण  बसायचं असतं. थोडक्यात, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण असेच आत जाऊ शकत नाही. 
इथे जेवताना काटा आणि सूरी याचा अधिक वापर केला जातो.
सुरुवातीला नेहमी ड्रिंक्स काय घेणार हा प्रश्न विचारला जातो.. ही इथली पद्धत प्रत्येक रेस्टोरंट मध्ये पाहायला मिळाली. 
इथे जेवणाची ऑर्डर घेणारी व्यक्ती आणि नंतर डिश उचलणारी व्यक्ती एकच असते. इथे डिश उचलताना त्या एकावर एक ठेवून घेऊन जातात. आपल्याइथे प्रत्येक कामासाठी अनेकवेळा वेगळी व्यक्ती असते. शिवाय जेवणाची ऑर्डर देताना प्रत्येक व्यक्ती स्वतःची ऑर्डर स्वतः सांगतो. आपल्याइथे सगळेजण मिळून ऑर्डर ठरवतात आणि बहुतेकवेळा एकच व्यक्ती सांगते ही पद्धत इथे नसते. ऑर्डर दिल्यावर इथे मेन्यूकार्ड घेऊन जाण्याची पद्धत आहे. काहीवेळा dessert  मेन्यू च मेन्यूकार्ड हे वेगळं असतं. इथे दरवेळा ज्याने आपली ऑर्डर  घेतलेली असते ती व्यक्ती आपल्याला पदार्थ आवडले का? हे आवर्जून विचारायला येते. 
बिल पे करताना 'कस्टमर कॉपी' आणि 'मर्चंट कॉपी' अशा दोन कॉपीज  असतात. यात झालेल्या बिलावर आपल्याला टीप add  करून त्याची किंमत लिहायची असते. अनेकवेळा बिलात  टीप किती add करायची हे लिहिलेलं असतं .. उदा. १५% किंवा १८%.  काही ठिकाणी टीप आधीच add  करून किंमत लिहिलेली असते. टीप add  करून साइन करून झाल्यावर आपण आपली कस्टमर कॉपी घेऊन निघू शकतो. कारण आपलं कार्ड त्यांनी आधीच स्वाईप करून आपल्याला आणून दिलेलं असतं. आपण बिलावर टीप add  करून लिहिलेली किंमत नंतर ते त्यात टाकतात.  


इथल्या खाद्यपदार्थांची चव: सुरुवातीच्या काळातला मला आलेला अनुभव 


इथे आल्यावर सुरुवातीला मला कोणताच पदार्थ अजिबात आवडायचा नाही. तेव्हा मग कितीही बेस्ट रेस्टोरंट मध्ये गेलो तरी मला काहीच विशेष आवडायचं नाही. कारण इथल्या पदार्थांची टेस्ट develop  व्हायला मला तरी चार महिने लागले.. 

इथे बरेचसे पदार्थ मला अळणी, अगदी कमी मीठ मसाला असलेले..शिवाय वेगवेगेळे सलाड.. आणि त्या प्रत्येक सलाड मध्ये कच्या हिरव्या पालेभाज्या, पनीर सारखं असणारं  टोफू वगैरे वगैरे..बाकी  बरेच पदार्थ हे ब्रेड शी संबंधित.. चमचमीत असा कोणताच पदार्थ मला तरी वाटायचा नाही.. पण हळूहळू इथली टेस्ट कळायला लागली. 
आणि आता इथली टेस्ट डेव्हलप झाली या गोष्टीवर मी शिक्कामोर्तब करू शकतेय.. त्याचं  कारण म्हणजे सुरुवातीला म्हंटले  ते 'डम्पलिंग्ज' ... 

त्याचा किस्सा असा आहे.. तर, आम्ही एक आठवड्यापूर्वी 'दिन ताई फंग' या रेस्टोरंट मध्ये जेवायला गेलो. मस्त 'जास्मिन टी' मागवली होती. आणि 'व्हेजिटेबल  डम्पलिंग्ज' मागवले होते. हा पदार्थ म्हणजे आपण ज्याप्रमाणे मोदकाची उकड काढतो त्याप्रमाणेच असतो.. फक्त आकार करंजीसारखा आणि आणि त्यात व्हेजिटेबल्स. इथे आल्यावर आम्ही सर्वात पहिले याच फाईन डाइन मध्ये जेवायला गेलो होतो. इथले dumplings फेमस आहेत म्हणून विराज मला खूप उत्साहाने इथे घेऊन आला होता. पण मला तेव्हा इथलं काही म्हणजे काहीच आवडलं नव्हतं. आणि हा पदार्थ चॉपस्टिक ने खायचा असतो तर ते सुद्धा तेव्हा जमत नव्हतं. सगळं अळणी  लागत  होतं. पण आता गंमत  म्हणजे तेच dumplings आणि तेच रेस्टोरंट आणि तिच चव, तोच पदार्थ माझा एकदम फेव्हरेट झाला आहे.. 
हे मला मागच्या आठवड्यात आम्ही गेलो होतो तेव्हा कळलं. 



तर...  ही होती गोष्ट एका पदार्थाची.. हा पदार्थ खाता खाता मला हा आत्ताचा  ब्लॉग या विषयावर लिहावासा वाटला. आणि त्यानिमित्ताने इथल्या रेस्टोरंट बद्दल लिहिता आलं. 

पण अनेक रेस्टोरंन्टस  मधल्या काही गमतीजमती, तिथले खास पदार्थ.. 
पुढच्या काही भागांमध्ये नक्की लिहिणार आहे. 

धन्यवाद !!



Thursday, November 22, 2018

मी पाहिलेली अमेरिका- भाग ६

अमेरिकेतील 'नाट्यगृह' आणि नाटक-'दि फँटम ऑफ दि ऑपेरा'


'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' नावाचं  नाटक आम्ही पाहायला जाण्याचं ठरवलं. मूळात  'नाटक' हा माझा आवडीचा विषय. माझ्या घरीसुद्धा सगळ्यांना नाटकाची आवड. विशेषतः बाबांना. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच रंगभूमीवर आलेलं प्रत्येक नाटक आवडीने पाहिलं. मला आठवतंय.. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक मी तिसरीत असताना  पाहिलं होतं... शिवाय 'अश्रूंची झाली फुले', 'नटसम्राट', 'बटाट्याची चाळ', 'नकळत सारे घडले', संगीत सौभद्र, 'हसवा  फसवी', 'कोडमंत्र', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'संगीत मस्त्यगंधा', 'संगीत संशयकल्लोळ'... यांसारखी  सगळीच दर्जेदार नाटकं पाहिली होती. 
त्यामुळे आता अमेरिकेत आल्यावर इथलं नाट्यगृह कसं असेल? रंगमंच कसा असेल ? इथे नाटक पाहायला येणारा  रसिक प्रेक्षक  कसा असेल...? अशा सगळ्याच गोष्टींबद्दल उत्सुकता मनात घेऊन मी नाटक पाहायला गेले. 
        
आम्ही सिऍटल मधल्या 'पॅरामाऊण्ट' नावाच्या नाट्यगृहात हे नाटक पाहायला गेलो होतो. या नाटकाचं पोस्टर पाहूनच नाटकाबद्दल उत्सुकता वाटत होती.


नाट्यगृहाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या रांगेत आम्ही उभे होतो. तिथे प्रत्येकाच्या  तिकिटावरचा कोड स्कॅन करून एकेका व्यक्तीला आत पाठवत होते. आपल्याइथे सुद्धा अशीच पद्धत आहे. तशीच पद्धत इथेही होती.  
नाट्यगृह रुबाबदार आणि मोठं आहे हे जाणवलं. मध्यभागी काचेचं मोठं झुंबर होतं. हजार बाराशे प्रेक्षक बसतील एवढी त्याची क्षमता होती.




        
      आम्ही जेव्हा आमच्या सीट वर बसलो आणि स्टेजकडे पाहिलं तेव्हा एक क्षण  मला आम्ही खूपच वर आहोत..आणि स्टेज  खूपच खाली आहे असं  जाणवलं. स्टेज  खूप खोल वाटतं होता. 
    रंगमंच.. लाल रंगाचा जाड कापडाचा पडदा, शिवाय नाट्यगृहात मध्यभागी असलेलं मोठं झुंबर... हे सगळं मी पाहत होते. आणि तेवढ्यात नाटक सुरु होणार असल्याची अनाउन्समेंट झाली. आम्ही मोबाईल वगैरे सायलेंट वर केले. पडदा उघडला आणि नाटक सुरु झालं. 
       इंग्रजी भाषेतलं नाटक आणि ते सुद्धा 'संगीत' नाटक मी पहिल्यांदी पाहत होते. काही गोष्टी कळत होत्या, काही कळत नव्हत्या. जेव्हा कलाकार गाण्यातून संवाद साधत होते तेव्हा गोष्ट समजायला कठीण जायची.. कारण त्या गाण्याची चाल.. आणि ते गाण्याचे बोल आपल्यासाठी  नेहमीचे नसल्यामुळे लक्षात यायचं नाही. पण साधारण देहबोली आणि चेहऱ्याच्या हावभावांवरून नाटकाची कथा कळत असल्यामुळे नाटक समजत होतं.  
          नाटक पाहताना माझं एकदम स्टेजच्या  एका  कोपऱ्याकडे लक्ष गेलं. तेव्हा एक व्यक्ती  स्टेजच्या  कोपऱ्यावर उभी  होती. ते काही माझ्या लक्षात आलं  नाही  तेव्हा विराज ला विचारल्यावर मला समजलं की, मुकबधीर व्यक्तींसाठी संपूर्ण नाटक त्यांच्या 'साईन' च्या भाषेत त्यांना सांगितलं जात आहे. अशा व्यक्तींसाठी एक वेगळी रांग असते. हे पाहून मला खूपच छान वाटलं. 
         
          'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' ही एक कादंबरी आहे. या कादंबरीचे  मूळ  लेखक Gaston Leroux.जे  फ्रेंच जर्नलिस्ट होते. जर्नलिस्ट म्हणून काम करताना त्यांना काही नाटकांचं समीक्षण करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे या निमित्ताने त्यांचा अनेक ठिकाणी प्रवास होत होता.
ऑपेरा हाऊस  मध्ये  भूत आहे अशा काही अफवा त्याकाळी पसरल्या  होत्या. मग त्यांनी  कल्पना करायला सुरुवात केली की, हा 'फँटम' खरंच खरा असेल का? आणि याच धर्तीवर ही कादंबरी आहे..

जे भविष्यात  'नाटक' आणि 'चित्रपट' या दोन्ही प्रकारांत  समोर आलं.

 'दि फँटम ऑफ दि ऑपेरा' या नाटकाबद्द्ल-

संदर्भ स्रोत- विकिपीडिया 



कथानक- 

         अनेक कलाकार पण 'तीन' मुख्य पात्र याभोवती फिरणारी ही कथा आहे. जुनी  नाटक कंपनी जाऊन आता नवीन नाटक कंपनी येणार असते.. तोच व्यवस्थापन बदलण्याचा दिवस..  या प्रसंगापासून  नाटकाची सुरुवात होते. जुन्या नाटक कंपनी चा तो शेवटचा प्रयोग असतो. त्या नाटकातील मुख्य गायिकेचा आवाज बिघडतो त्यामुळे कोरस  मध्ये गाणाऱ्या 'क्रिस्टीन'ला  मुख्य गायिकेच्या जागी  गाणं सादर करण्याची संधी मिळते. 


ती तिच्या उत्तम आवाजाने सगळ्यांची मन  जिंकून घेते. पण नव्या नाटक कंपनीचं म्हणणं अजून तेच असतं  की,  'त्यांची पूर्वीची गायिका परत आल्यावर क्रिस्टीन ला मुख्य रोल देण्याची गरज नाही..' अशा विचारात ते  असतात. क्रिस्टीन ला त्या नाटकात पाहून, तिचा आवाज ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा लहानपणीचा मित्र तिला ओळखतो आणि तिच्याबद्दल वाटणारं  प्रेम त्याला आठवतं. तो तिला भेटायला जातो..  तेव्हा ती तिच्या खोलीत नसते. 
क्रिस्टीन कुठे गेलेली असते? त्या ऑपेरा हाऊस  मधल्या भुताने तर तिला नेलं नाही ना? असा विचार आपल्या मनात येतो ना येतो... तसंच  काहीसं  घडतं. 


क्रिस्टीन विषयी थोडक्यात सांगायला गेलं तर, तिला तिच्या बाबांनी  लहानपणी सांगितलेलं असतं  की,  'एन्जल ऑफ म्युझिक' तुला शिकवायला येईल.   त्यामुळे जो फँटम  असतो म्हणजे भूत असतो ज्याच्याकडून ती अनेक वर्ष गाणं शिकत असते त्यालाच ती तिच्या बाबांच्या सांगण्याप्रमाणे  'एन्जल ऑफ म्युझिक' समजत असते. पण तिच्या बद्दल प्रेम वाटणाऱ्या तिच्या मित्राच्या लक्षात येतं  की  तो  'एन्जल ऑफ म्युझिक' नाही तर 'फँटम ऑफ ऑपेरा' आहे. क्रिस्टीन ला मुख्य पात्र म्हणून घेण्यासाठी तो एकदा त्या नाटक कंपनीला पत्र  पाठवतो.. शिवाय  बॅकस्टेज काम करणाऱ्या माणसाला मारून टाकतो. असे प्रसंग तिथे घडत असतात. तेव्हा ती त्याला घाबरायला लागते. कारण  आजपर्यंत त्याने त्याची ओळख जगासमोर आणलेली नसते. तेव्हा एकदा क्रिस्टीन त्याच्या जवळ जाते आणि चेहऱ्यावरचं मास्क काढते. तिच्या लक्षात येतं  की , हा कोणी 'एन्जल ऑफ म्युझिक' नाही तर भूत आहे. त्याला ओठ नसतात.. नाक नसतं. तो भूत म्हणजेच फँटम ऑफ ऑपेरा तिच्यावर प्रेम सुद्धा करत असतो. आणि एक अर्थाने तिला शिष्य सुद्धा मानत  असतो. हे सत्य समजल्यावर ती वडिलांच्या कबरीपाशी जाते. खूप रडते. आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रियकराला भेटून त्याला सांगते .. 'मला यांच्यापासून वाचव'.  याने मला फसवलं आहे. 


    
        अशी कथानकात रंगत येत असते... आणि शेवटी फँटम, क्रिस्टीन आणि तिचा प्रियकर समोरासमोर येतात. त्यांच्यात झटाझटी.. मारामारी होते. 
एका क्षणी क्रिस्टीन लाच त्याची कीव  येते. आणि ती त्याच्यासोबत  वचनबद्ध राहण्याचा विचार करते. पण हे ऐकून त्याला जाणवत की,  आजपर्यंत त्याला तिच्याशिवाय कोणीच चांगलं मानलं नाहीये. तेव्हा तोच तिच्या जगातून जायचा निर्णय घेतो... 

यात नाटक पाहताना सगळ्यात मोठं आश्चर्य शेवटच्या या प्रसंगात वाटतं जेव्हा 'फँटम ऑफ ऑपेरा' नाटक पाहताना सुद्धा शेवटच्या क्षणी आपल्या समोर असताना नाहीसा होतो.. आणि त्याचे कपडे फक्त तिथे पडतात...
आणि इथे नाटकाचा शेवट होतो.
  

( Please Note- आत्ता  प्रवासांत  असल्यामुळे Youtube  वरील ब्लॉग अभिवाचन गुरुवारी म्हणजेच २९ नोव्हेंबर ला पब्लिश केले जाईल.)